पुरुष मतदारांना गृहीत धरू नका
पुरुष मतदारांना गृहीत धरू नका
Apr 4, 2014, 12.00AM IST
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
आज जवळपास सर्वच राजकीय पक्ष महिलांच्या व्होट बँकेवर डोळा ठेवून आहेत; पण देशात पुरुष मतदारांची संख्या महिला मतदारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पुरुष मतदारांना गृहीत धरणे धोक्याचे ठरेल, असा इशारा सेव्ह इंडिया फॅमिली फाउंडेशनने (सिफ) दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘सिफ’ने देशातील पुरुषांच्या प्रश्नांकडे राजकीय पक्षांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज देशात असंख्य पुरुष बलात्कार, हुंडाबळीच्या खोट्या आरोपांमध्ये अडकले आहेत. गृह मंत्रालयातील आकडेवारीनुसार मागील १० वर्षांत ३ लाख महिला तसेच ८ लाख पुरुषांना हुंडा प्रकरणात केवळ तक्रारीवरून अटक झाली. हे पुरुषांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. त्यामुळे रिंगणातील उमेदवार पुरुषांच्या प्रश्नावर काय भूमिका घेतात, हे पाहूनच मतदान करण्याचे आवाहन ‘सिफ’ने केले आहे.
देशातील प्रमुख उमेदवारांना ‘सिफ’ने काही प्रश्न विचारले आहेत. कौटुंबिक हिंसाचार कायद्यात पुरुषांचा छळ होणार नाही, यासाठी संसदेत विधेयक आणणार काय? घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान पुरुषांना आपल्या मुलांना भेटताही येत नाही. त्यांनाही आपल्या मुलांच्या पालन पोषणात सहभागी होण्यासाठी तसा कायदा करणार काय? लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणे याला तुम्ही बलात्कार समजता काय? अशा स्वरूपाचे हे प्रश्न आहेत.
देशात विवाहित पुरुषांच्या आत्महत्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कौटुंबिक समस्या हे पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमुख कारण आहे. २०१२ या वर्षात अशा कारणामुळे २० हजार विवाहित पुरुषांनी आत्महत्या केली , तर १२ हजार महिलांनी आपली जीवनयात्रा संपविली. ही आकडेवारी पुरुषांची अवस्था स्पष्ट करणारी आहे. महिलांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या विकासासाठी सर्वच पक्ष बोलतात, पण पुरुषांच्या उन्नतीचे काय, असा ‘सिफ’चा सवाल असून, महिला व्होट बँकेचा विचार करताना पुरुष व्होट बँकेचेही भान ठेवा, असे बाजवले आहे. भारतात ४९ टक्के महिला आणि ५१ टक्के पुरुष मतदार आहेत. पुरुष विरोधी कायद्यामुळे आजवर अनेक पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे जे उमेदवार पुरुषांचे प्रश्न संसदेत मांडतील, त्यांनाच मतदान करण्याचे आवाहन ‘सिफ’चे मध्य भारत अध्यक्ष राजेश वखारिया यांनी केले आहे.